जळगाव, (प्रतिनिधी) : मनातील संवेदनशीलता आणि सामाजिक भावनेतून साकारलेले अमूर्त शैलीतील ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन सध्या जळगावमध्ये कलाप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. ही चित्रे चित्रकलेला एक नवदृष्टीकोन देत असून, काळ्या गडद आकारातून मनाला ओसाड प्रदेशात अबोल नकाशा दाखवून नाविन्याचा शोध सुरू करतात, जिथे अंधारातून प्रकाशाची आणि माणूस होण्याची प्रक्रिया सुरू होते, असा सुर यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.
जैन इरिगेशनचे संस्थापक पद्मश्री भवरलालजी जैन यांना समर्पित असलेले हे ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन रिंगरोडवरील कलादालनात दि. १ ते १५ डिसेंबर दरम्यान सर्वांसाठी खुले आहे.
चित्रांमधून ‘प्रकाश आणि सावल्यांची अनुभूती’..
उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी चित्रकलेच्या विविध पैलूंवर भाष्य केले. पुणे येथील चित्रकार शरद तरडे यांनी जळगावातील चित्रकलेत आनंदाचे हावभाव आणि शुद्धता जाणवली, असे सांगत जैन इरिगेशनच्या प्रोत्साहन देणाऱ्या भूमिकेबद्दल आभार मानले. प्रा. राजेंद्र पाटील (मुंबई) यांनी जळगावसारख्या शहरात अमूर्त शैलीतील समकालीन चित्रे प्रत्येकाला प्रोत्साहन देऊन जातात, असे म्हटले. राजू महाजन (चोपडा) यांनी अमूर्त शैलीतील चित्रे वेगळा विचार मांडणारी असून त्यात आठवणींचा प्रवास, प्रकाश-सावल्यांचा आकार आणि गाव-व्यवस्था यांचे प्रतिबिंब दिसते, असे सांगितले.
यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, कवी अशोक कोतवाल, खिरोद्याचे प्राचार्य अतुल मालखेडे, मुंबईचे प्रा. राजेंद्र पाटील, चोपड्याचे राजु महाजन, कलादालनाचे श्री. ढेरे यांच्यासह चित्रकार विकास मल्हारा, विजय जैन, शरद तरडे, शुचिता तरडे उपस्थित होते. जैन इरिगेशनचे अनिल जोशी, सचिन मुसळे, निरंजन शेलार यांच्यासह अनेक मान्यवर व कलाप्रेमींनी प्रदर्शनाला भेट दिली. कार्यक्रमाचे आभार ज्ञानेश्वर शेंडे यांनी मानले.








