जळगाव, (प्रतिनिधी) : पिंप्राळा परिसरातील सुतारवाडा भागात एक बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना शनिवार, २९ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली आहे. चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंप्राळा येथील रहिवासी प्रमिलाबाई साहेबराव चौधरी (वय ६५) या त्यांच्या मुलीकडे सोनगीर येथे गेल्यामुळे त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि ८ हजार रुपये रोख रक्कम असा, एकूण ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
घर उघडलेले दिसल्याने शेजाऱ्यांनी तत्काळ या घटनेची माहिती प्रमिला चौधरी यांना दिली. चौधरी यांनी जळगाव येथे परत येऊन या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








