भूसंपादनाबाबत ‘MADC’ला तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश
जळगाव, (प्रतिनिधी) : येथील विमानतळाचा महत्त्वाकांक्षी विस्तार प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेला आता गती मिळाली आहे. मौजे कुसुंबा (ता. जळगाव) येथील जमीन संपादनासंदर्भातील महत्त्वपूर्ण आढावा बैठक नुकतीच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. विमानतळ विस्ताराच्या दृष्टीने हा प्रकल्प जिल्ह्याच्या औद्योगिक, कृषी आणि पर्यटन विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या बैठकीत जमीन मोजणी, मालकीचे निर्धारण, मूल्यांकनाचे निकष आणि आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांच्या नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC), महसूल विभाग, विमानतळ प्राधिकरण आणि हितसंबंधित शेतकरी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत जमीन संपादन अहवालांचा तांत्रिक आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला (MADC) जमीन संपादन प्रक्रियेचा अद्ययावत अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, विमानतळाच्या विकासासाठी अत्यावश्यक असणारा रनवे (धावपट्टी) विस्तार, सुरक्षा क्षेत्र वाढ आणि सेवा-सुविधा उभारणी यांसारख्या बाबींवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. भूसंपादनासंबंधीचे प्रलंबित मुद्दे निकाली काढण्यासाठी आणि प्रक्रिया पारदर्शक व गतीमान पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
या बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे, शेतकरी प्रतिनिधींशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना आणि मते जाणून घेण्यात आली. त्यांच्या सहकार्यातूनच हा प्रकल्प यशस्वी होईल, यावर प्रशासनाने भर दिला. यावेळी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी, मुंबईचे प्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे, तसेच भूसंपादन समन्वय अधिकारी, संबंधित विभागीय अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.








