एरंडोल, (प्रतिनिधी) : एरंडोल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची रंगत जसजशी वाढत आहे, तसतसा महायुतीचा प्रचारही जोर धरू लागला आहे. याच अनुषंगाने आज एरंडोल शहरातील प्रभाग क्र. १, ९ व १० मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार अमोलदादा पाटील यांनी भव्य रॅली काढत जनतेच्या भेटी-गाठी घेतल्या आणि त्यांचे शुभाशीर्वाद घेतले. तसेच, ओम नगर आणि भोई गल्ली परिसरातील श्रीराम मंदिराजवळ कॉर्नर सभेने त्यांनी शहरवासियांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना आमदार अमोलदादा पाटील यांनी एरंडोल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आजवर आपण २०० हून अधिक कोटींचा निधी आणण्यात यशस्वी झाल्याचे सांगितले. “यात नुसतीच कामे करायची म्हणून कामे केली नाहीत, तर यासोबत नवनवीन संकल्पना राबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण केला,” असे ते म्हणाले. ‘पुस्तकांचा बगीचा’ ही संकल्पना राज्यभर चर्चेला आली आणि त्यामुळे एरंडोल नगरीचे नाव सर्वत्र गाजले, असे त्यांनी नमूद केले.
ज्या अपेक्षेने माय-बाप जनतेने आपल्याला निवडून दिले, त्या आशा-अपेक्षा जतन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न यापुढेही सातत्याने करत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. आमदार अमोलदादा पाटील यांनी महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. नरेंद्र ठाकुर यांच्यासह प्रभाग क्र. १ अ च्या उमेदवार कल्पना मनोज पाटील, प्रभाग क्र. १ ब चे उमेदवार अभिजित राजेंद्र पाटील, प्रभाग क्र. ९ ब चे उमेदवार नितेश कैलास चौधरी, प्रभाग क्र. १० अ च्या उमेदवार मनकरनाबाई चैतराम चौधरी आणि प्रभाग क्र. १० ब चे उमेदवार नय्युम खान दलशेर खान यांच्यासह महायुतीचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, जि. प. माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, युवासेना जिल्हाप्रमुख तथा प्रभाग क्र. ५ ब चे उमेदवार प्रा. मनोज पाटील, धरणगांव बाजार समितीचे माजी सभापती शालिक गायकवाड, तालुकाप्रमुख रवि जाधव, पं. स. माजी सभापती दादाजी पाटील, माजी नगराध्यक्ष राजुआबा चौधरी, किशोर निंबाळकर, अमित पाटील, समाधान पाटील, एस.आर. पाटील, धरणगांव बाजार समितीचे माजी उपसभापती तथा संचालक किरण पाटील, खडके येथील जगदीश पाटील, शहरप्रमुख बबलु चौधरी यांच्यासह शिवसेना-भाजपा महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि शहरवासिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.








