जळगाव, (प्रतिनिधी) : येथील गंधार कला मंडळातर्फे रविवार, २१ डिसेंबर २०२५ रोजी जळगाव येथे मराठी चित्रपट गीतगायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा बळीराम पेठेतील ब्राह्मण सभेत दुपारी १२:३० वाजता सुरू होईल. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, ९ ते १४ वयोगटातील लहान गट (इयत्ता ४थी ते ९वी) आणि खुला गट (मोठा गट) अशा दोन गटांत विभागली आहे.

यात मराठी चित्रपटातील भावगीत, भक्तीगीत, गझल, अभंग, भजन, गवळण यांसारखे कोणतेही गीत प्रकार गाता येतील. स्पर्धकांना गीताचे फक्त दोन कडवे गाण्याची परवानगी आहे. मंडळातर्फे वाद्ये व साथीदार उपलब्ध केले जातील. दोन्ही गटांतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना स्व. राजाराम देशमुख ‘स्वरगंधार’ करंडक प्रदान करण्यात येईल. मोठ्या गटासाठी (स्व. शरद नागराज यांच्या स्मरणार्थ) रोख बक्षिसे (प्रथम ₹१५०१) आणि लहान गटासाठी रोख व भेट स्वरूपात बक्षिसे आहेत. सहभागी स्पर्धकांना प्रवेश फी लागू राहणार आहे.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ९३२५३५३१९८ किंवा ९८९०३३४००८ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.







