जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या तयारीदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मनपा आयुक्तांना निवेदन सादर करत मतदार याद्यांमधील गोंधळावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. मतदार याद्या पूर्णपणे अद्ययावत झाल्याशिवाय निवडणूक प्रक्रिया राबवू नये, अशी मागणी पक्षाने केली आहे.
निवेदनानुसार, मनपा प्रशासन गेल्या तीन महिन्यांपासून निवडणूक तयारी करत असले तरी, प्रारूप प्रभाग रचना, आरक्षण सोडत आणि आता प्रारूप मतदार याद्या प्रकाशित करण्याच्या प्रक्रियेत ‘गलथान कारभार’ दिसत असून दोन महिन्यांपूर्वी जाहीर झालेल्या प्रभाग रचनेवरील अनेक नागरिकांच्या हरकतींवर मनपाने कोणतीही कारवाई केली नाही. असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पक्ष्याच्या मते, हा सर्व गोंधळ सत्ताधारी पक्षाच्या इच्छुक उमेदवारांना निवडणूक लढणे सोपे जावे यासाठी ‘राजकीय दबावाला बळी पडून सोयीस्करपणे’ करण्यात आला आहे.
प्रमुख मागण्या आणि इशारा..
प्रभाग मतदार यादीतील दुबार नावे, मृतांची नावे आणि दुसऱ्या विधानसभा मतदारसंघातील नावे कमी केल्याशिवाय निवडणूक प्रक्रिया राबवू नये. मतदार यादीवर हरकत नोंदवण्यासाठी आणखी आठ दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात यावा.
अन्यथा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी माजी अध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला अध्यक्ष मंगला पाटील, कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, युवक अध्यक्ष रिकु चौधरी, माजी नगरसेवक सुनील माळी, राजू मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








