जळगाव, (प्रतिनिधी) : पेट्रोल पंपाच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागातील एका आरेखक कर्मचाऱ्याला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री रंगेहाथ पकडले. वासुदेव धोंडू पाथरवट (वय ५३, रा. विश्वकर्मा भवन, मोहित नगर, जळगाव रोड, भुसावळ) असे ताब्यात घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे
तक्रारदाराने त्यांच्या पेट्रोल पंपासाठी आवश्यक असलेले ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता. दरम्यान प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी आरेखक पाथरवट याने सुरुवातीला २,००० रुपये आणि काम झाल्यानंतर १५,००० रुपये देण्याची मागणी केली होती.
तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनंतर धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तातडीने सापळा रचला. त्यानुसार, सोमवार, दिनांक २४ (नोव्हेंबर) रोजी रात्री सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातच वासुदेव पाथरवट याला १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत जळगाव येथील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.








