विद्यार्थी सहायक समितीतर्फे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कुमार केतकर यांचे महत्त्वपूर्ण व्याख्यान
जळगाव, (प्रतिनिधी): जगापुढे पर्यावरणीय बदल, अणुशस्त्रांचा धोका आणि सोशल मीडियातून पसरणारी खोटी माहिती या तीन मोठ्या संकटांमुळे ‘महाधोका’ निर्माण झाला आहे, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व माजी खासदार कुमार केतकर यांनी केले. निसर्गाचे अमाप नुकसान करून मनुष्य स्वतःच्याच अस्तित्वाला धोका निर्माण करत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. येथील विद्यार्थी विकास प्रतिष्ठान संचलित विद्यार्थी सहायक समिती, जळगाव तर्फे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते ‘कुंडली अस्वस्थ जगाची’ या विषयावर बोलत होते.
पर्यावरणीय बदलावर बोलताना कुमार केतकर म्हणाले की, उत्तराखंडमध्ये केदारनाथ भागात बांधकाम करू नये, असा स्पष्ट इशारा शास्त्रज्ञांनी दिला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच तेथे मोठ्या मानवी हानीचे नुकसान झाले. निसर्गाचे सातत्याने नुकसान केल्याने मानवाला मोठा धोका निर्माण झाला आहे, पण याबाबत आवश्यक तेवढी जनजागृती होत नाहीये.
अणुशस्त्रे आणि फेक-न्यूजमुळे अस्वस्थता..
ते म्हणाले, “जगातील शांतताप्रेमी शास्त्रज्ञांनी एका मासिकातून जागतिक धोक्याची सूचना दिली आहे. जगाला अणुशस्त्रांचा मोठा धोका निर्माण झाला आहे.” त्याचबरोबर, सध्या मराठी वृत्तवाहिन्या जगातील अस्वस्थतेची वस्तुस्थिती मांडत नाही, ही शोकांतिका आहे. सोशल मीडियातून फिरणाऱ्या खोट्या माहितीमुळेदेखील जगात अस्वस्थता पसरत आहे, असेही केतकर यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर येथील ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ. सुनीलकुमार लवटे होते. यावेळी स्त्रीवादी विचारवंत शारदा साठे, समितीचे सचिव डी.एन.पाटील, माजी प्राचार्य डॉ. एस.एस.राणे उपस्थित होते. प्रस्तावनेतून प्राचार्य डॉ. राणे यांनी समितीच्या २५ वर्षांतील वाटचालीची माहिती दिली. तसेच, ॲड. प्रकाश सपकाळे, अभियंता हरीश बोरसे, प्रतिक्षा कल्पराज या माजी विद्यार्थ्यांनी ‘कमवा व शिका’ योजनेमुळे आपले करिअर कसे घडले, आपले जीवन कसे उजळून निघाले, हे सांगताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
अध्यक्षीय भाषणातून प्रा.डॉ. लवटे म्हणाले की, सुधारकांच्या सुधारणा परंपरेचे काम विद्यार्थी सहायक समितीच्या माध्यमातून जळगावात सुरू आहे. महाराष्ट्रात ६०-७०च्या दशकात सामाजिक काम कुटिरोद्योगसारखे होते. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी आता समाजातील व्यक्तींनी पुढे आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले, तर आभार यू.डी. चौधरी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी शहरातील अनेक मान्यवरांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.








