जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील एमआयडीसी परिसरातून ६१ गॅस सिलेंडरची चोरी करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शोध पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेले संपूर्ण १,२२,०००/- रुपयांचे ६१ गॅस सिलेंडर आणि गुन्ह्यात वापरलेले ५,००,०००/- रुपये किमतीचे आयशर वाहन (Eicher Vehicle) जप्त केले आहे.
काय आहे प्रकरण?
एमआयडीसी परिसरातील फिर्यादी यांनी १४ नोव्हेंबर रोजी रात्री भारत पेट्रोलियम, जळगाव येथून रिफिलिंग केलेले ३४२ गॅस सिलेंडर ट्रकमध्ये भरून पार्किंग केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी, १५ नोव्हेंबर रोजी, फिर्यादी वाहन घेण्यासाठी आले असता त्यांना ट्रक रस्त्याच्या कडेला उभा दिसला, परंतु त्यातील तब्बल ६१ गॅस सिलेंडर गायब असल्याचे लक्षात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने तातडीने तपास सुरू केला. गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. त्यानुसार, १८/११/२०२५ रोजी एमआयडीसी परिसरात सापळा रचून शेख फिरोज शेख याकुब (रा. नशिराबाद, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान, त्याने आपला साथीदार सैय्यद मुश्ताक सैय्यद अशपाक (रा. उस्मानिया पार्क, जळगाव) याच्यासोबत मिळून ही चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून चोरीला गेलेले ६१ नग गॅस सिलेंडर (१,२२,०००/- रु.) आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले आयशर वाहन (५,००,०००/- रु.) असा एकूण ६,२२,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सूचनेनुसार ही यशस्वी कामगिरी पार पडली.
गुन्हे शोध पथकाचे पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, पोह गणेश शिरसाळे, प्रदीप चौधरी, गिरीश पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, नितीन ठाकुर, किरण पाटील, शशिकांत मराठे यांनी अत्यंत कौशल्यपूर्णरित्या तपास करून ही कारवाई पूर्ण केली.








