जळगाव (प्रतिनिधी) : राज्यातील बालकांपर्यंत मराठी संस्कृतीची व परंपरांची महती पोहचावी. त्यांनी लोककलांचा अभ्यास करुन ही परंपरा पुढे जोपासावी या उद्देशाने बालरंगभूमी परिषदेतर्फे दरवर्षी ‘जल्लोष लोककलेचा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदा शहरात दि. २८ व २९ नोव्हेंबर रोजी बालरंगभूमी परिषद जळगाव शाखेतर्फे या महोत्सवाचे ला.ना. सार्वजनिक विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील बालकलावंतांच्या सर्वांगिण कलात्मक विकासासाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या बालरंगभूमी परिषदेतर्फे महाराष्ट्राची कला व परंपरा जपतांना बालमनावर संस्कार करण्याच्या अनुषंगाने ‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. लोककलांचा प्रगल्भ वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात लोककलांना उर्जितावस्था प्राप्त व्हावी व लोककलांचे केवळ मनोरंजनात्मक स्वरुप न राहता या कलांची महती बालकांपर्यंत पोहचून गायन, वादन, नृत्य क्षेत्रात त्यांनी कौशल्य प्राप्त करावे हा या महोत्सवाचा उद्देश आहे.
या महोत्सवात समूह लोकनृत्य व समूह लोकगीत गायनासोबतच एकल लोकनृत्य, लोकगीत गायन व लोकवाद्य वादनाचे स्पर्धात्मक आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व बालकलावंतांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासोबतच समूह लोकनृत्य व समूह लोकगीत गायनाकरिता सर्वोत्कृष्ठ ४ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, उत्कृष्ठ ३ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तम २ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तर १ हजार रुपये व प्रमाणपत्र, एकल लोकगीत गायन, लोकवाद्य वादन व लोकनृत्य याकरिता सर्वोत्कृष्ठ २ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, उत्कृष्ट १५०० रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तम १ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच ५०० रुपये व प्रमाणपत्र असे प्रशंसनीय पारितोषिके देण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील बालकलावंतांनी या महोत्सवात सहभागासाठी आपल्या विद्यालयामार्फत योगेश शुक्ल (9657701792), सचिन महाजन (7620933294), हर्षल पवार (8830256068), मोहित पाटील (9067304797), आकाश बाविस्कर (9130343656) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बालरंगभूमी परिषद जळगाव शाखेतर्फे करण्यात आले आहे.








