जळगाव, (प्रतिनिधी) : भडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातून २० ऑक्टोबर रोजी एकाच कुटुंबातील ०३ अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात मोठी भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे भडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते.
गुन्ह्याचे गांभीर्य आणि पोलीस अधीक्षकांचे निर्देश..
एकाच वेळी आणि एकाच कुटुंबातील ०३ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचे प्रकरण गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी तात्काळ या गुन्ह्याचा बारकाईने तपास करण्याचे आदेश दिले. तपासादरम्यान, बेपत्ता मुलींच्या मित्र/मैत्रिणी आणि नातेवाईकांकडे कसून चौकशी केली असता, जवळपासच्या परिसरातील ०३ तरुण मुले देखील बेपत्ता झाल्याचे निष्पन्न झाले. सर्व मुलामुलींचे मोबाईल बंद असल्याने तपासात मोठे आव्हान होते.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषण ठरले निर्णायक..
तपासाचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव आणि चाळीसगाव अशा दोन वेगवेगळ्या दिशांना दोन पथके रवाना करण्यात आली. जळगाव येथील पथकाला रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महत्त्वपूर्ण धागा मिळाला. दि. २० ऑक्टोबरच्या रात्री ०१.२२ वाजता संशयित मुले आणि बेपत्ता मुली रेल्वे स्टेशनच्या तिकीट घराच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले.
या आधारावर, रेल्वे स्टेशनमध्ये त्या वेळेत ये-जा करणाऱ्या ट्रेन्सची माहिती घेण्यात आली आणि ते सर्व जण झेलम एक्सप्रेसने गेल्याचे निश्चित झाले. तांत्रिक बाबींचा आधार घेत आणि संशयितांच्या नातेवाईकांकडे कसून चौकशी केल्यावर पोलिसांना त्यांचे नेमके ठिकाण समजले.
राजस्थानमधून सुटका आणि आरोपींना अटक..
पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तांत्रिक बाबींचा वापर करत आणि कोणताही सुगावा नसताना अथक प्रयत्न करून अखेर आरोपींचा शोध लावला. राजस्थान राज्यातील अलवर जिल्ह्यातून पोलिसांनी आरोपी रोशन उर्फ श्रावण धनगर मालचे, अजय सुकलाल देवडे आणि अमोल इश्वर सोनवणे यांना ताब्यात घेतले आणि तिन्ही अल्पवयीन मुलींची सुखरूप सुटका केली.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव विभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश शर्मा, पोलीस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे, पोहेकाँ पांडुरंग पाटील, पोना मनोहर पाटील, पोकाँ महेंद्र चव्हाण, पोकाँ प्रविण परदेशी, पोकाँ मिलींद जाधव, आणि मपोकाँ सोनि सपकाळे यांनी लावला.








