जळगाव, (प्रतिनिधी) : मुंबई-चेन्नई/कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या महत्त्वाच्या महानगरी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याची धमकीवजा सूचना आढळल्याने आज मध्य रेल्वेच्या संपूर्ण मार्गावर मोठी खळबळ उडाली आहे. एक्स्प्रेसच्या एका डब्यातील शौचालयात ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि ‘आयएसआय’ (ISI) यांसारखी देशविरोधी वाक्ये लिहिलेली आढळल्यामुळे सुरक्षा यंत्रणा तातडीने कामाला लागल्या असून, सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महानगरी एक्स्प्रेसच्या एका डब्यातील स्वच्छतागृहात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हा धमकीवजा संदेश लिहिला होता. या संदेशात दहशतवादी संघटना ‘आयएसआय’च्या नावाचा उल्लेख होता, तसेच गाडीमध्ये बॉम्ब असल्याची गंभीर सूचनाही देण्यात आली होती. दादर स्थानकावरच ही माहिती सुरक्षा यंत्रणांच्या निदर्शनास आल्याने तेव्हापासूनच सर्व स्थानकांवर विशेष दक्षता घेण्यात येत होती.
भुसावळ स्थानकावर कसून तपासणी..
या घटनेच्या गंभीरतेमुळे भुसावळ रेल्वे स्थानक येथे विशेष दक्षता घेण्यात आली. महानगरी एक्स्प्रेस सकाळी 8.30 वाजेला भुसावळ स्थानकावर दाखल होताच, रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि लोहमार्ग पोलीस (GRP) यांच्या संयुक्त पथकाने तातडीने कारवाई सुरू केली.
श्वान पथक आणि बॉम्ब शोधक व निकामी पथकांना (BDS Squad) तातडीने पाचारण करण्यात आले. संपूर्ण एक्स्प्रेसच्या प्रत्येक डब्याची आणि प्रवाशांच्या सामानाची कसून तपासणी करण्यात आली. रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक पी आर मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्ब शोधक पथकाने (BDS Squad) संपूर्ण गाडीची तपासणी केली आणि महानगरी एक्स्प्रेस पुढील मार्गासाठी रवाना करण्यात आली.
खोडसाळपणा की मोठा कट? तपास सुरू..
जीआरपी पोलीस निरीक्षक सुधीर धायकर यांनी सांगितले की, गाडीत ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि ‘आयएसआय’ असे लिहिलेले वाक्य कोणीतरी पुसून टाकले होते. ही घटना केवळ खोडसाळपणाचा भाग आहे की, त्यामागे कोणताही मोठा कट आहे, याचा तपास सुरक्षा यंत्रणांनी सुरू केला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन सुरक्षा यंत्रणांनी केले असून, तपास पूर्ण होईपर्यंत हाय अलर्ट कायम राहणार आहे.







