जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात पार्टीदरम्यान झालेल्या वादातून गोळीबार झाल्याच्या घटनेत आकाश उर्फ टपऱ्या युवराज बाविस्कर (२८, रा. कांचननगर) याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याप्रकरणी एकूण सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, विक्की चौधरी याला अटक करण्यात आली आहे, तर गोळी झाडणारा मुख्य संशयित आकाश (उर्फ डोया) मुरलीधर सपकाळे हा अद्याप पसार आहे.
वादाची ठिणगी आणि गोळीबार..
९ नोव्हेंबर रोजी रात्री आकाश बाविस्कर, आकाश सपकाळे, गणेश सोनवणे आणि सागर पाटील यांची पार्टी सुरू होती. यावेळी त्यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली. त्यानंतर, प्रशांत चौकात हा वाद विकोपाला गेला आणि गोळीबार झाल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
संशयित आकाश सपकाळे याने सर्वप्रथम गणेश सोनवणे याच्यावर गोळीबार केला. यावेळी त्याने पुन्हा गोळी झाडली, जी गणेशला न लागता आकाश बाविस्कर याच्या छातीत घुसली. रुग्णालयात उपचार सुरू असताना आकाश बाविस्कर याचा मृत्यू झाला.
कुंटणखान्याच्या माहितीचा संशय..
गोळीबार करणारा आकाश सपकाळे हा मन्यारखेडा शिवारातील कुंटणखान्यात भागीदार होता. गेल्या आठवड्यात नशिराबाद पोलिसांनी या कुंटणखान्यावर कारवाई केली होती. ही माहिती सागर पाटील आणि गणेश सोनवणे यांनी पोलिसांना दिल्याचा संशय आकाश सपकाळेला होता. याच संशयावरून त्यांच्यात वाद झाल्याचे बोलले जात आहे.
हद्दपार असताना शहरात गोळीबार..
गोळीबार करणारा आकाश सपकाळे आणि जखमी गणेश सोनवणे या दोघांवर यापूर्वी हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे, तरीही ते शहरात येऊन अशा गुन्ह्यात सहभागी झाले. गोळीबारानंतर पोलिसांनी संशयित विक्की चौधरी, जखमी तुषार सोनवणे आणि सागर पाटील यांना ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर, संशयित विक्की चौधरी याला अटक करण्यात आली असून, सागर पाटील आणि तुषार सोनवणे यांना सोडून देण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी दिली. गोळी झाडणारा मुख्य आरोपी आकाश सपकाळे याचा शोध पोलीस घेत आहेत.
सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल..
मृत आकाश याचे वडिल युवराज बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १) आकाश (उर्फ डोया) मुरलीधर सपकाळे (पसार), २) गणेश उर्फ काल्या रवींद्र सोनवणे, ३) सागर सुधाकर पाटील, ४) तुषार उर्फ साबू रामसिंग सोनवणे, ५) विक्की अरुण चौधरी (अटक), ६) करण पाटील (रा. कुसुंबा, ता. जळगाव) या सहा संशयित आरोपींविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस मुख्य संशयित आकाश सपकाळे याचा कसून शोध घेत आहेत.








