जळगाव, (प्रतिनिधी) : मणियार बंधूंना नियमांनुसार आवश्यक असलेली कोणतीही कायदेशीर पूर्तता न करताच पिस्तुलाचा परवाना दिल्याबद्दल, तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) चौकशी व्हावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी ब्रिगेड या संघटनेने केली आहे. दि. २ नोव्हेंबर रोजी पद्मालय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी ही मागणी जोरकसपणे मांडली.
परवाना मिळाल्यापासून पीयूष मणियार सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कंबरेला पिस्तूल लावून पैशांची उधळण करत आहेत. यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच शिंदे यांनी मणियार बंधूंचे स्थानिक पोलिसांसोबत ‘अर्थपूर्ण संबंध’ असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच, मणियार बंधूंच्या कारभारामागील प्रमुख सूत्रधार (आका) कोण आहे, याचीही सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी सुरू न झाल्यास, छत्रपती शिवाजी ब्रिगेडतर्फे जळगाव शहरात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अध्यक्ष अशोक शिंदे यांनी या वेळी दिला.










