जळगाव, (प्रतिनिधी) : चोपडा शहरामध्ये एका मोठ्या रस्तालुटीच्या तयारीत असलेल्या सात सराईत व आंतरजिल्हा गुन्हेगारांना चोपडा शहर पोलिसांनी मध्यरात्री जेरबंद केले आहे. दि.२७ ऑक्टोबर च्या मध्यरात्री अडीच वाजता पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, शिरपूर बायपास रोडवर रणगाडा चौकाजवळ एका पांढऱ्या रंगाच्या ‘स्विफ्ट डिझायर’ कार (क्र. एम एच २६ सी एच १७३३) मध्ये संशयित इसम थांबले होते.
पोलीस पथकाने तातडीने घेराव घालून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सातही आरोपींना पकडले. त्यांच्याकडून २ गावठी कट्टे (लोड केलेले), २ तलवारी, १ रिकामे मॅगझीन, मोबाईल फोन, रोख रक्कम आणि चारचाकी कार असा एकूण ₹१३,१०,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पकडलेल्या सात आरोपींमध्ये नांदेड, वैजापूर (संभाजीनगर) आणि चोपडा येथील रहिवासी असलेल्या नामचीन गुन्हेगारांचा समावेश आहे. त्यांच्यावर यापूर्वी खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दंगल, अग्निशस्त्रे बाळगणे यांसारखे अनेक गंभीर गुन्हे नांदेड, वैजापूर आणि चोपडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत.
अटक करण्यात आलेल्यांची नावे..
१) दिलीपसिंघ हरीसिंघ पवार (वय ३२, रा. नांदेड)
२) विक्रम बाळासाहेब बोरगे (वय २४, रा. संभाजीनगर)
३) अनिकेत बालाजी सुर्यवशी (वय २५, रा. नांदेड)
४) अमनदिपसिंघ अवतारसिंग राठोड (वय २५, नांदेड)
५) सद्दामहुसेन मोहंम्मद अमीन (वय ३३, रा. नांदेड)
६) अक्षय रविंद्र महाले, (वय ३०, रा. चोपडा)
७) जयेश राजेंद्र महाजन (वय ३०, रा. चोपडा)
यापैकी दोन आरोपी नुकतेच महाराष्ट्र धोकादायक कृत्यांना प्रतिबंध अधिनियम (MPDA) कायद्यान्वयेच्या स्थानबध्दतेतून बाहेर आलेले आहेत. एका आरोपीवर वैजापूर येथील दरोडा व आर्म ॲक्टच्या गुन्ह्यात तो फरार होता. नांदेडमधील काही आरोपी शस्त्रे दाखवून खंडणी वसुल करणे, खंडणीसाठी अपहरण करणे, लोकांना विवस्त्र करून छळ करणे व त्याचे व्हिडीओ तयार करून दहशत माजवणे अशा कृत्यांमध्ये सामील असल्याचे उघड झाले आहे. या आरोपींविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, पोहेकों हर्षल पाटील, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, पोकों अजिंक्य माळी, अमोल पवार, मदन पावरा, रविंद्र मेढे, विनोद पाटील, किरण धनगर, योगेश पाटील, प्रकाश ठाकरे यांचा समावेश होता. पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.










