जळगाव, (प्रतिनिधी) : अभिजात संगीताच्या क्षेत्रात गेली २३ वर्षे सातत्याने कार्यरत असलेल्या स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आणि संपूर्ण भारतभर सुपरिचित असलेल्या कोलकाता येथील आयटीसी (ITC) संगीत रिसर्च अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावात दोन दिवसीय मिनी संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ‘कोलॅबोरेशन’मुळे खान्देशच्या संगीत रसिकांना उच्च दर्जाच्या अभिजात संगीताची मेजवानी मिळणार आहे.
हे संगीत संमेलन शनिवार व रविवार, दि. १ व २ नोव्हेंबर २०२५ रोजी भैय्यासाहेब गंधे सभागृहात संध्याकाळी ७ ते १० या वेळेत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जळगावच्या खासदार स्मिता वाघ आणि आयटीसीचे गुरु पं. ओंकार दादरकर यांच्या हस्ते होणार आहे. या दोन दिवसीय महोत्सवात आयटीसीचे दोन स्कॉलर विद्यार्थी आणि दोन प्रतिथयश कलावंत सहभागी होणार आहेत.
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून आयोजनाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी दीपक चांदोरकर, अरविंद देशपांडे, शरदचंद्र छापेकर, दीपिका चांदोरकर, नुपूर खटावकर आदी मान्यवर उपस्थित होते.









