भुसावळ, (प्रतिनिधी) : शहरात एका पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्याची गंभीर घटना घडली होती. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. मात्र, भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या २४ तासांच्या आत या गुन्ह्याचा छडा लावत आरोपीला ताब्यात घेतले आणि मुलीला तिच्या आई-वडिलांच्या सुपूर्द केले.
याप्रकरणी फिर्यादी काजल मुन्ना ठाकुर (वय २९ वर्ष, रा. भाखा अमरपूर, जि. दिंडोरी, म.प्र.) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात आरोपीविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीची खात्री करण्यात आली. या माहितीच्या आधारावर, गोरेलाल भगवानसींग कछवे उर्फ भिलाला (रा. अजदरा) हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांच्या पथकाने कारवाई करत आरोपी गोरेलाल याला उजनी देवस्थान, ता. बोदवड येथून ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातुन अपहृत मुलीलाही सुखरूप ताब्यात घेण्यात आले असून, तिला फिर्यादींच्या ताब्यात देण्यात आले आहे. यापूर्वीही आरोपीवर चैनपूर पोलीस स्टेशन, जि. खरगोन (म.प्र.) येथे अपहरणाचा गुन्हा दाखल आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ संदिप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो. निरी. नितीन पाटील, पो. उप निरी. मंगेश जाधव, पो.हे.कॉ. विजय नेरकर, पो.हे.कॉ. कांतीलाल केदारे, पो.हे.कॉ. रवींद्र भावसार, आणि पो.शि. योगेश माळी, प्रशांत सोनार, भुषण चौधरी, अमर अढाळे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा आणि नेत्रम कॅमेरा विभागाच्या पथकाने केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ व पो.हे.कॉ. रमण सुरळकर करीत आहेत.










