जळगाव, (प्रतिनिधी) : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातर्फे कार्यानुभव विषयांतर्गत नुकतीच पर्यावरणपूरक आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून, कलात्मकतेतून आणि पर्यावरणाविषयीच्या जागृतीने आकर्षक व पूर्णतः पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार केले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी थर्माकॉल, प्लास्टिक किंवा रासायनिक रंगांचा वापर पूर्णपणे टाळून कागद, कापड, बांबूच्या काड्या आणि टाकाऊ वस्तूंचा योग्य उपयोग केला. या कृतीतून ‘दिवाळी पर्यावरणपूरक साजरी करा’ हा महत्त्वाचा संदेश विद्यार्थ्यांनी समाजाला दिला.
मानवी श्रृंखलेतून साकारला आकाशकंदिल..
कार्यशाळेचे विशेष आकर्षण ठरली, विद्यार्थ्यांनी साकारलेली ‘मानवी आकाशकंदिल प्रतिकृती’. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन प्रत्यक्ष मानवी श्रृंखलेच्या माध्यमातून एका भव्य आकाशकंदिलाचे रूप साकारले. या अभिनव कृतीतून विद्यार्थ्यांनी एकता, सहकार्य आणि सर्जनशीलतेचा सुंदर संदेश दिला.
मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आपल्या कल्पनाशक्तीने व पर्यावरणपुरक पध्दतीने सण अधिक उत्साहाने साजरा करता येतो. कार्यक्रमाला निलेश पवार, सोनाली चौधरी, करिष्मा वंजारी व आश्विनी शिंपी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.