जळगाव, (प्रतिनिधी) : वाळू वाहतुकीचा डंपर विनाअडथळा सुरू ठेवण्यासाठी तहसिलदार व तलाठी यांच्या नावाने मासिक हफ्ता म्हणून ₹७३,०००/- लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जळगाव येथे एका खाजगी इसमाला रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणात तलाठी आणि कोतवाल यांचाही समावेश असून त्यांच्यावरही भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्या वाळूच्या डंपरला अडचण नको म्हणून शिवदास लटकन कोळी (खाजगी पंटर, रा. तिने, ता. भुसावळ) याने तहसिलदार व तलाठी यांच्यासाठी दरमहा ₹७३,०००/- चा हफ्ता द्यावा लागेल, असे तक्रारदारांना सांगितले. या मागणीची तक्रार तक्रारदार यांनी १५ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
तक्रारीनुसार, १५ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता शिवदास कोळी याने ‘तहसिलदार, मंडळ अधिकारी व तलाठी’ यांच्यासाठी दर महिन्याला ₹७३,०००/- चा हफ्ता द्यावा लागेल, असे सांगितले. यावेळी नितीन पंडीतराव केले (तलाठी, सज्जा वऱ्हाडसिम) व जयराज रघुनाथ भालेराव (कोतवाल, कडोरा बुद्रूक) यांनी लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचे समोर आले. यानंतर १३ ऑक्टोबर ला एसीबीच्या पथकाने सापळा रचून शिवदास कोळी याने तक्रारदार यांच्याकडून ₹७३,०००/- लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताच सापळा पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.
सापळा कारवाई दरम्यान तलाठी नितीन केले यांच्या ताब्यात असलेल्या बॅगेची झडती घेण्यात आली असता, त्यात ₹१,६५,०००/- रोख रक्कम आणि सॅमसंग कंपनीचे दोन मोबाईल मिळाले. तर, खाजगी पंटर शिवदास कोळी याच्या अंगझडतीत लाचेची रक्कम ₹७३,०००/- सह अतिरिक्त ₹८६,०००/- रोख रक्कम मिळून आली.
नितीन पंडीतराव केले (वय-४०, तलाठी, सज्जा व-हाडसिम, ता. भुसावळ), जयराज रघुनाथ भालेराव (वय-४९, कोतवाल, कडोरा बुद्रूक, ता. भुसावळ), शिवदास लटकन कोळी (वय-५९, खाजगी पंटर, रा. तिने, ता. भुसावळ) या तिन्ही आरोपींवर भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई ला.प्र.वि., जळगांवचे पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता नवघरे आणि पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या पथकाने केली.