जळगाव, (प्रतिनिधी) : एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार समीर हनीफ काकर (वय- २२, रा. विस्मील्ला चौक, तांबापुरा, जळगाव) याच्यावर महाराष्ट्र प्रतिबंधक स्थानबद्धता (एम.पी.डी.ए.) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. समीर काकर याला पुणे येथून अटक करून येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
गुन्हेगारीची पार्श्वभूमी आणि दहशत..
समीर काकर याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. तांबापुरा, मेहरुण, जळगाव परिसरात त्याची मोठी दहशत होती. सामान्य नागरिकांना विनाकारण मारहाण करणे, शिवीगाळ करणे, तसेच साथीदारांसह खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबर दुखापत, घरफोडी अशा प्रकारचे एकूण १३ गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांचा आलेख पाहून त्याला यापूर्वी एक वर्षासाठी हद्दपार देखील करण्यात आले होते. मात्र, हद्दपारीनंतरही त्याने आपले गुन्हेगारी कृत्य सुरुच ठेवले.
एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत कारवाई..
समीर काकरच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनकडून त्याच्याविरुद्ध एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याकडे पाठवण्यात आला होता. पोलीस अधीक्षकांनी सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर केला. त्यावर दिनांक ०४/०९/२०२५ रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी समीर हनीफ काकर यास येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले.
पुणे येथून अटक..
आदेश प्राप्त झाल्यापासून समीर काकर हा फरार होता. मात्र, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना गोपनीय बातमी मिळाली की, सदर फरारी आरोपी पुणे येथे आहे. माहिती मिळताच, त्यांनी एम.आय.डी.सी. पो.स्टे. च्या गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पो.ना. प्रदीप चौधरी, पो.काँ विशाल कोळी, आणि गणेश ठाकरे यांचा समावेश असलेले पथक तातडीने पुणे येथे रवाना केले. या पथकाने पुणे येथे आरोपीचा शोध घेऊन समीर काकर याच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला कायदेशीर प्रक्रियेनंतर येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे स्थानबद्ध केले आहे.
यशस्वी कारवाई..
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पो.ना. प्रदीप चौधरी, पो. काँ विशाल कोळी, गणेश ठाकरे, आणि योगेश घुगे यांनी केली आहे.