जळगाव, (प्रतिनिधी) : शहरालगतच्या तांबापुरा परिसरातील जे.के. पार्कजवळून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका व्यक्तीला ६० हजार रुपये किमतीच्या सहा ग्रॅम ‘एमडी’ (मेफेड्रोन) या अमली पदार्थासह अटक केली. महमूद हनीफ पटेल (वय ३५, रा. मास्टर कॉलनी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार अरमान चिंधा पटेल हा मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. ही कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना जे.के. पार्क परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी काही लोक येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. जे.के. पार्कजवळच्या स्विमिंग टँकजवळून महमूद हनीफ पटेल याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे झडती घेतली असता, ६० हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम एमडी ड्रग्ज, तसेच दोन मोबाईल फोन असा एकूण ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या महमूद हनीफ पटेल आणि पळून गेलेल्या अरमान चिंधा पटेल या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.