जळगाव, (प्रतिनिधी) : शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचं स्थान असलेल्या खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी (KCE) च्या स्थापनेला ८१ वर्षे पूर्ण झाली आहेत. या गौरवशाली वाटचालीच्या निमित्ताने १६ सप्टेंबर रोजी संस्थेच्या प्रांगणात एका विशेष कार्यक्रमाचं (वर्धापन दिन) आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात केसीईच्या सर्व संस्था एकत्रित येऊन त्यांची आतापर्यंतची प्रगती आणि भविष्यातील वाटचाल विविध अंगांनी सादर करणार आहेत. अशी माहिती शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या प्रसंगी एकूण १७ कार्यक्रम सादर होणार असून, यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू विजय माहेश्वरी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्यांच्यासोबत विशेष अतिथी म्हणून विद्यापीठाचे उप-कुलगुरू एस.टी.इंगळे देखील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान संस्थेचे उपाध्यक्ष अँड. प्रकाश पाटील भूषवणार आहेत. या सोहळ्यात संस्थेच्या कार्याची आणि वाटचालीची माहिती देणारी एक विशेष चित्रफीत सादर केली जाईल, ज्यातून केसीईच्या समृद्ध इतिहासाची झलक पहायला मिळेल.
१९४४ मध्ये ‘ज्ञान प्रसारो व्रतम’ या ब्रीदवाक्यासह सुरू झालेला हा प्रवास आज ८१ वर्षांचा झाला आहे. शिक्षण प्रसारक संस्थेच्या वास्तूमध्ये सुरुवात झाल्यानंतर, दानशूर मूळजी जेठा यांनी दिलेल्या जागेमुळे संस्थेला नवं रूप मिळालं. मागील पाच वर्षांत आयएमआर, इंजिनीअरिंग, मुलांचं वसतिगृह, लॉ कॉलेज आणि ५०० प्रेक्षक क्षमतेचं सुसज्ज नाट्यगृह यांसारख्या सुविधांची भर पडली आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० नुसार, केसीई आता अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विज्ञान, कला, वाणिज्य, भारतीय ज्ञान प्रणाली (IKS), भारतीय संगीत, रिफ्लेक्सोलॉजी, निसर्गोपचार आणि योग विज्ञान यांसारख्या अनेक अभ्यासक्रमांद्वारे शिक्षण देत आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत उपाध्यक्ष अँड. प्रकाश पाटील यांच्यासह डी.टी.पाटील, प्रा. मृणालिनी फडणवीस, शशिकांत वडोदकर, आणि प्राचार्य संजय भारंबे उपस्थित होते.