जळगाव, (प्रतिनिधी) : कासोदा पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून ७ जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण १,६६,०३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कासोदा पोलीस स्टेशन हद्दीतील कासोदा गावाजवळ असलेल्या बांभोरी शिवारात, गालापूर रोडवरील फैजल शेख यांच्या शेतात काही लोक जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती सहायक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांना मिळाली.
दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांनी एक पथक तयार करून घटनास्थळी रवाना केले. या पथकात पो.ना. अकिल मुजावर, पो.कॉ. समाधान तोंडे, प्रशांत पगारे, कुणाल देवरे, योगेश पाटील यांचा समावेश होता. या पथकाने दुपारी ४:३० वाजता छापा टाकला. यावेळी काही लोक जमिनीवर बसून पैशांवर पत्त्यांचा खेळ खेळताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलिसांनी शेख फारुख शेख नबी (वय ५०), शेख शहीद शेख रफिक (वय ४०), शेख निजाम शेख सिराज (वय ५२), तस्लीम सुलेमान खान (वय ५७), शेख हमीद शेख शौकत (वय ४३), शेख हमीद शेख अमीर (वय ४०) आणि शेख मुस्ताक खान अमीर खान (वय ६०) या सात जणांना अटक केली. हे सर्व कासोदा, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव येथील रहिवासी आहेत.
या आरोपींकडून पोलिसांनी रोख रु. ३,३८०, रु. २२००० किमतीचे मोबाईल आणि रु. १,४०,००० किमतीच्या ३ मोटारसायकल असा एकूण रु. १,६६,०३० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल समाधान तोंडे यांच्या तक्रारीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.