आई भवानी देवराईत वृक्षारोपण व पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात
जामनेर, (प्रतिनिधी) : “प्रकृतीचे रक्षण करणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. वृक्षारोपण जितके महत्त्वाचे आहे, तितकेच आधीपासून असलेल्या वृक्षांचे संरक्षण करणेही आवश्यक आहे,” असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन महामंडलेश्वर जनार्दनहरिजी महाराज यांनी केले. मोयगाव बु. व पिंपळगाव गोलाईत (ता. जामनेर) येथील आई भवानी देवराईत आयोजित वृक्षारोपण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी बोलताना महाराज म्हणाले की, कोणतेही चांगले कार्य सुरू करण्यासाठी सुरुवातीला एकट्याने सुरुवात करावी लागते, पण त्याचे चांगले परिणाम पाहून समाज आपोआप त्यात सामील होतो. आई भवानी देवराई परिसरात गेल्या वर्षात तब्बल ३२०० झाडे लावून त्यांचे काटेकोरपणे संगोपन करण्यात आले आहे. आज हिरवाईने नटलेला हा परिसर सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी उचललेल्या या पावलांमुळे भविष्यातील पिढ्यांसाठी एक मौल्यवान ठेवा निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘आई भवानी देवराई एक सचित्र वनगाथा’ पुस्तकाचे प्रकाशन..
या सोहळ्यात इतिहास अभ्यासक डॉ. विश्वजित सिसोदिया यांच्या ‘आई भवानी देवराई एक सचित्र वनगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दनहरिजी महाराज आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ‘देवराई’ ही संकल्पना कशी उदयास आली, ‘आई भवानी देवराई’ची कल्पना कशी सुचली आणि पर्यावरण रक्षणात देवराईचे महत्त्व काय आहे, या माहितीवर आधारित हे पुस्तक आहे. या देवराईला पुन्हा बहर आणण्यामध्ये इतिहास अभ्यासक डॉ. विश्वजित सिसोदिया, महेंद्रसिंग कच्छवाह आणि संपूर्ण वसुंधरा फाउंडेशनच्या टीमचे मोठे योगदान असल्याचे सांगून महाराजांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे विशेष सन्मान..
यावेळी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष प्रवीणसिहं पाटील, विलाससिंह पाटील, विठ्ठलसिहं मोरे, आणि भगवानसिंह खंडाळकर यांच्या वतीने प.पू. महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज यांचा “सन्मान चिन्ह” देऊन विशेष सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर, आई भवानी देवराईत ३२०० वृक्ष जगवून हरित क्रांती घडवणाऱ्या डॉ. विश्वजित सिसोदिया यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यांच्या सोबतच त्यांच्या टीमचाही “सन्मान चिन्ह” देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केळी तज्ञ डॉ. के.बी. पाटील, प.पू. श्यामचैतन्यजी महाराज, विलाससिंह पाटील, विठ्ठलसिंह मोरे, भगवान खंडाळकर, नजरकैदचे संपादक प्रवीण सपकाळे, मोयगावचे सरपंच प्रा. महेंद्रसिंग कच्छवाह, माजी सभापती नवलसिंह पाटील, प्रदीप लोढा, ॲड. देवेंद्रसिंह जाधव, पिंपळगावच्या सरपंच उषाताई पाटील, दिलीपसिंह पाटील, जामनेर वनविभाग व वनीकरण विभागातील अधिकारी उपस्थित होते.
यावेळी वसुंधरा फाउंडेशनचे डॉ. विश्वजित सिसोदिया, सरपंच महेंद्रसिंग कच्छवाह, जीवनसिंह पाटील, नंदू पाटील यांच्यासह अनेक गावकऱ्यांनी वृक्षारोपण व संगोपनासाठी विशेष परिश्रम घेतले. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून महिला व मुलांनीही यात सहभाग नोंदवला.