जळगाव, (प्रतिनिधी) : महावितरणच्या पाचोरा येथील उपविभागामध्ये कार्यरत असलेले सहाय्यक अभियंता मनोज जगन्नाथ मोरे (वय ३८) यांना २९ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ला.प्र.वि.) रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदार व्यक्तीच्या सोलर फिटिंगच्या कामांसाठी रिलीज ऑर्डर काढण्याच्या बदल्यात त्यांनी ही लाच स्वीकारली.
तक्रारदार यांचा सोलर फिटिंगचा व्यवसाय आहे. त्यांनी तीन नवीन प्रकरणांच्या रिलीज ऑर्डरसाठी ९ हजार रुपये (प्रत्येकी ३ हजार रुपये) आणि यापूर्वीच्या २८ प्रकरणांसाठी ७० हजार रुपये (प्रत्येकी २५ हजार रुपये) अशी एकूण ७९ हजार रुपयांची लाच मोरे यांच्याकडे मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदाराने ११ ऑगस्ट रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव येथे तक्रार दाखल केली. पडताळणीदरम्यान, मोरे यांनी तीन नवीन प्रकरणांसाठी ९ हजार रुपये आणि जुन्या २८ प्रकरणांसाठी ७० हजार रुपयांपैकी ३० हजार रुपये स्वीकारल्याचे आणि उर्वरित ४० हजार रुपयांपैकी २० हजार रुपये तसेच नवीन ९ हजार रुपये असे एकूण २९ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली.
१२ ऑगस्ट रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने मोरे यांच्या कार्यालयात सापळा रचला. या कारवाईदरम्यान, मोरे यांनी तक्रारदाराकडून २९ हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई ला.प्र.वि. जळगावचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे आणि त्यांच्या पथकाने (पो.कॉ. राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर, चालक सुरेश पाटील) यशस्वीपणे पार पाडली.