जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीमध्ये यंदा मोठी चुरस दिसून आली. या निवडणुकीत ॲड. सागर चित्रे यांनी अध्यक्षपदाचा विजय मिळवला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार ॲड. संजय राणे यांचा १०१ मतांनी पराभव केला. अध्यक्षपदासोबतच इतर पदांवरही नवीन पदाधिकारी विराजमान झाले आहेत. उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे, सचिवपदी ॲड. वीरेंद्र पाटील, सहसचिवपदी ॲड. लीना म्हस्के आणि कोषाध्यक्षपदी ॲड. प्रवीण चित्ते यांची निवड झाली आहे.
मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान पार पडले. एकूण १०१० मतदारांपैकी ८८१ मतदारांनी आपला हक्क बजावला, म्हणजेच ८७.२२% मतदान झाले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. महिला सदस्य पदासाठी ॲड. शारदा सोनवणे आणि ॲड. कल्पना शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.