जळगाव, (प्रतिनिधी) : सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या टायगर ग्रुप, भारत या संघटनेने धरणगाव तालुक्यात संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या नव्या नियुक्त्यांमुळे तालुक्यातील सामाजिक उपक्रमांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर जाधव आणि राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या आदेशानुसार, तसेच टायगर ग्रुप उत्तर महाराष्ट्र प्रमुख सागर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.
धुळे येथील कार्यालयात झालेल्या बैठकीत टायगर ग्रुप खान्देश अध्यक्ष ऋषिकेश भांडारकर यांनी कार्यकर्त्यांच्या मागील कामांचा आढावा घेतला. गेल्या दोन वर्षांपासून धरणगाव तालुक्यात सामाजिक उपक्रम आणि युवक सक्षमीकरणाच्या विविध पातळ्यांवर कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना या बैठकीत नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या.
यात, धरणगाव तालुकाध्यक्षपदी कल्पेश कोळी यांची निवड करण्यात आली आहे, तर शहेबाज शेख यांच्याकडे तालुका उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भूषण महाजन यांची तालुका संपर्कप्रमुख म्हणून निवड झाली आहे. शहर पातळीवर विजय मोहिते यांची शहराध्यक्षपदी, तर सुनील कुराडे यांची शहर उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे.
या निवडींमुळे संघटनेच्या कामात नवा उत्साह संचारणार असून, तालुक्यातील सामाजिक कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास खान्देश अध्यक्ष ऋषिकेश भांडारकर यांनी व्यक्त केला. “संघटनेच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आपली विचारधारा पोहोचवण्याचे काम ही नवी कार्यकारिणी निश्चितच करेल,” असे ते म्हणाले.
नवीन पदाधिकाऱ्यांनी आपल्या निवडीनंतर संघटनेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. आगामी काळात आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, महिला सक्षमीकरण उपक्रम आणि युवकांसाठी मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. टायगर ग्रुपचा विस्तार आणि सामाजिक जाणीव तालुक्यात अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही नवी कार्यकारिणी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास स्थानिक पातळीवरून व्यक्त होत आहे.