जळगाव, (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यात पिंपळकोठा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पिता गंभीर जखमी झाला आहे. तर त्यांच्या १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. घटनेबद्दल एरंडोल पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरु होते. तर मुलाच्या मृत्यूप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला प्राथमिक अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रामा किसन चारण (वय ६५, रा. उदयपूर, ता. पंधाना जि. खंडवा, मध्यप्रदेश) असे जखमी इसमाचे नाव आहे. तो उदयपूर येथे पत्नी, ४ मुलांसह राहत होता. मजुरी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे. दरम्यान, सोमवारी दि. ५ मे रोजी रामा चारण व त्यांचा मुलगा अमीर रामा चारण (वय १३) हे दुचाकीने उदयपूर येथून जळगाव जिल्हा मार्गे धुळे येथे कामानिमित्त निघालेले होते. दुपारी १२ वाजता एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठाजवळ त्यांची दुचाकी आली असता अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दोन्ही पितापुत्र रस्त्याच्या कडेला झुडपांत फेकले गेले.
यात अमीर चारण याचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी रामा चारण यांना व अमीरचा मृतदेह जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला. रामा चारण यांच्यावर प्रथमोपचार झाल्यानंतर संध्याकाळी नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. सुरुवातीला अनोळखी म्हणून दोघांची ओळख पोलिसांनी पटविली. स्थानिक एरंडोल पोलिसांनी घटनेची नोंद घेत घटनास्थळी धाव घेतली. तर जळगाव येथील शासकीय रुग्णालयात अमीर चारण याचा पंचनामा जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी केला. मंगळवारी शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला. या अपघाताची एरंडोल पोलीस स्टेशनला नोंद घेण्यात आली असून धडक देणाऱ्या वाहनाचा पोलीस शोध घेत आहे.