यावल, (प्रतिनिधी) : तालुक्यातील मनवेल आणि डांभुर्णी या दोन ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या दोन चिमुकल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपये अश्या एकूण ५० लाख रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.
सेवा हक्क दिनानिमित्त यावल येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित तालुकास्तरीय आढावा बैठकीत या मदतीचे वितरण करण्यात आले. या बैठकीत आमदार सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. या बैठकीस यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड (बोरसे), गट शिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी जहॉंगीर तडवी, तसेच वनविभागाच्या पश्चिम क्षेत्राचे वनपाल विपुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मनवेल ता. यावल येथे दि. ६ मार्च रोजी बिबट्याच्या हल्ल्यात ७ वर्षीय केशव बारेला या बालकाचा मृत्यू झाला होता. तर डांभुर्णी ता. यावल गावच्या शिवारात १५ एप्रिल रोजी मेंढीपालन करणाऱ्या ठेलारी कुटुंबातील २ वर्षीय रत्नाबाईचा बळी बिबट्याने घेतला होता. या दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी २५ लाख रुपये इतकी मदत मंजूर होऊन थेट त्यांच्या हाती देण्यात आली.