पारोळा, (प्रतिनिधी) : पारोळा शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावर म्हसवे शिवारात अहमदाबाद येथून अमरावती येथे गुटखा, सुगंधित तंबाखू घेऊन जाणाऱ्या कंटेनरवर नाशिक येथील आयजी पथक व पारोळा पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत लाखो रुपयांचे गुटखा व सुगंधी तंबाखू रंगेहाथ पकडले. यात सुमारे ५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पारोळा शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावर गुटखा घेऊन कंटेनर जाणार असल्याची गोपनीय माहितीच्या आधारावर नाशिक येथील आयजी पथक व पारोळा पोलीस सदर म्हसवे येथे दाखल झाले. यावेळी साधारण सांयकाळी ५ वाजेच्या सुमारास म्हसवे शिवारात (जीजे २३ वाय ९३७३) कंटेनर दाखल झाले असता पोलिसांनी कंटेनरला रोखले. कंटेनरची झाडाझडती घेतली असता पुढील भागात कंटेनरमध्ये प्लास्टिकच्या ताडपत्री, मागील बाजूस ५० ते ६० मोठ्या पोत्यात सुगंधी तंबाखू, गुटखाजन्य पदार्थ ठेवलेल्या अवस्थेत असलेले आढळून आले.
या सुगंधी युक्त तंबाखू गुटख्याची किंमत साधारण ५० लाखाच्या जवळपास असल्याची माहिती मिळाली असून याबाबत कंटेनर ट्रकवरील चालक भरत वीरसिंग वाळवंट (वय ३५, दावत जि. गोधरा, गुजरात) याला ताब्यात घेण्यात आले असून सुगंधी तंबाखू व गुटखाजन्य पदार्थ हा गुजरातमधून महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात उतरणार होता. रात्री उशिरापर्यंत पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक योगेश महाजन, हेकॉ डॉ. शरद पाटील, अभिजीत पाटील, महेश पाटील, किशोर भोई, आदींनी कारवाई केली. घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.