जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील आयोध्या नगर परिसरात आर्थिक कारणावरून वाद झाल्याने एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर चाकूने जबर वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी हा स्वतःहून पोलीस स्टेशनला जमा झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम एमआयडीसी पोलीस स्टेशनला सुरू होते.
मोहित सुनील चौधरी (वय २४, रा.भादली ता. जळगाव) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो भादली येथे परिवारासोबत राहतो. मोहितचा संशयित आरोपी धीरज प्रल्हाद पाटील (वय २३, रा. हनुमान नगर, जळगाव) याच्याशी ओळख होती. दोघांमध्ये यापूर्वी आर्थिक देवाण-घेवाण झालेली होती. या आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून बुधवारी दि. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास अयोध्या नगरातील हनुमान मंदिराजवळ मोहित चौधरी हा आला असता धीरज पाटील याच्याशी त्याचा वाद झाला.
त्याच्यातून धीरज पाटील याने मोहित याच्या पोटावर सपासप चाकूचे वार करून गंभीर जखमी केले. आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी प्रथमोपचार करून मोहित चौधरी याला खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती जाणून घेतली. तर संशयित आरोपी धीरज प्रल्हाद पाटील हा स्वतःहून पोलीस स्टेशनला जमा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.