जळगाव, (प्रतिनिधी) : घरगुती गॅस अवैधरीत्या रिक्षामध्ये भरणाऱ्या सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकून १ लाख ७० हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरगुती गॅस अवैधरित्या रिक्षामध्ये भरताना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी धाड टाकून २७ गॅस हंडी, एक रिक्षा, पंप व इतर साहित्य असा १ लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी शेख नौशाद शेख नजीर, रवींद्र चौधरी यांना ताब्यात घेण्यात आले. त्याच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक शरद बागल, पोह कमलाकर बागुल, गोपाल गव्हाळे, संघपाल तायडे, सचिन पोळ, भारत पाटील सर्व स्थानिक गुन्हा शाखा जळगाव यांनी केली आहे.