अमळनेर, (प्रतिनिधी) : अमळनेर ते टाकरखेडा दरम्यान रेल्वे रूळावर छिन्नविछिन्न अवस्थेत एका पोलिसाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. दि. १२ डिसेबर रोजी दुपारी साडेचार वाजता हा प्रकार समोर आला होता. दरम्यान ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू असताना हा मृतदेह चोपडा तालुक्यातील अडावद पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी संजय आत्माराम पाटील (वय ५१) यांचा असल्याचे समजून आले. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिस तपास सुरू असतांना, १४ डिसेंबर रोजी चोपडा शहर पोलिसात मिसिंग गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली. मृतदेहाच्या कपड्यांवरून व चप्पलावरून पोलिस कॉन्स्टेबल संजय पाटील यांचा मृतदेह असल्याचे त्यांच्या पत्नीने ओळखले. यावरून नातेवाईकांनी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात जाऊन मृतदेहाची खात्री केली, आणि पत्नीने ही मृतदेह त्यांचाच असल्याचे स्पष्ट केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेचा तपास पोलीस हवालदार गणेश पाटील करीत आहेत.