कोल्हापूर, (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील चिमगाव येथे दोन सख्या बहीण भावांचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली आहे. फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा केक खाल्ल्याने ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. श्रीयांश रणजीत आंगज (वय वर्ष ५) आणि काव्या रणजीत आंगज (वय वर्ष ८) अशी मयत बहीण भावांची नावे आहेत. दरम्यान फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा केक खाल्ल्याने त्यांची तब्येत बिघडली होती. त्यामुळे विषबाधा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे चिमगाव परिसरात शोकाकुल वातावरण पसरलेला आहे.
शिळा केक खाल्ल्याने श्रीयांश आणि काव्य या दोघांना उलटी आणि मळमळ असा त्रास जाणू लागला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेत असतानाच मुलगा श्रेयांश याला जास्त त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्याला तातडीने मुरगुड इथल्या एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, यावेळी श्रीयांश चा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.
श्रेयांशवर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर मुलगी काव्या हिला देखील त्रास जाणवू लागला. दरम्यान तिला कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काव्याची प्रकृती अधिकच खालावली आणि सायंकाळी तिचीही ही प्राणज्योत मालावली. एकाच कुटुंबातील दोन भावंडांचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच मुरगुड पोलिसांनी तपास सुरू केला आहे.