२९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव, (प्रतिनिधी) : येथील एकलव्य क्रीडा संकुल मैदानावर २९ नोव्हेंबरपासून (शुक्रवारी) चार दिवसीय ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनास सुरुवात होत आहे. या प्रदर्शनात २०० हून अधिक स्टॉल्स असून शेतमजुरांना पर्यायी कृषी यंत्र व औजारे यावर प्रामुख्याने भर हे कृषी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असेल. २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यानचे हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी मोफत असून प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांनी केले.
तरुणांसाठी व्यवसायाची संधी..
सुशिक्षित तरुणांसाठी विविध कंपन्यांची तालुकानिहाय डीलरशिपच्या माध्यमातून व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. शेत मजुरीला पर्यायी ठरतील असे पिकांच्या लागवडीपासून ते पिकांच्या काढणीपर्यंतच्या अवस्थेतील विविध प्रकारचे अत्याधुनिक कृषी यंत्र व औजारांचे स्वतंत्र दालन आहे. फवारणीसाठीचे ड्रोन, वन्य प्राण्यांपासून शेतातील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी झटका मशीन, सोलरवरील वॉटर पंपाचे प्रात्यक्षिकही पहावयास मिळेल. क्षारमुक्त वॉटर कंडिशनरच्या (आरओ) वापरामुळे जमिनीचा पोतही सुधारेल व उत्पादकता वाढण्यासही मदत होईल. कमी पाण्यात अधिक उत्पादन देणार्या विविध पिकांमधील वाणांबाबत सखोल मार्गदर्शन, करार शेती, केळी, पपई, उसासारख्या विविध फळे व भाजीपाल्याच्या नर्सरी, किचन गार्डन टूल्स, काटेकोर पाणी व्यवस्थापन तसेच बदलत्या हवामानानुसार पीक लागवड व तंत्रज्ञानाची माहितीदेखील या प्रदर्शनात मिळेल.
कृषी विभागाच्या विविध शासकीय योजना, बँक, कृषी विषयक पुस्तकेही एकाच छताखाली उपलब्ध होतील. एवढेच नव्हे तर खवय्यांसाठी खास खाऊ गल्ली तसेच शॉपिंग महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे. अॅग्रोवर्ल्ड आयोजित या कृषी प्रदर्शनासाठी जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड, नमो बायोप्लांट्स प्रायोजक आहेत. प्लॅन्टो कृषी तंत्र, निर्मल सिड्स, ओम गायत्री नर्सरी व श्रीराम ठिबक सहप्रयोजक आहेत.
मोफत भाजीपाला बियाणे व आरोग्य तपासणी..
निर्मल सीड्सतर्फे पहिल्याच दिवशी प्रदर्शनास येणाऱ्या पहिल्या पाच हजार शेतकऱ्यांना भाजीपाला बियाणे सॅम्पल पाकीट मोफत देण्यात येईल. त्याचबरोबर गोदावरी फाउंडेशनतर्फे पुरुष तसेच महिला शेतकऱ्यांसाठी प्रदर्शन स्थळीच प्राथमिक आरोग्य तपासणी चारही दिवस मोफत असेल, असेही आयोजकांनी सांगितले.