पित्यानंतर आता मुलीचेही निधन
जळगाव, (प्रतिनिधी) : वाहनात गॅस भरतांना सिलिंडरचा स्फोट होवून गंभीर जखमी झालेल्या २३ वर्षीय तरुणीचा पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेत आतापर्यंत ११ जखमींपैकी ७ जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तर दालवाला परिवारातील ५ जण दगावल्याने त्यांच्या परिवारात शोककळा पसरली आहे.
रश्मी संजय तेरवडीया (दालवाला) (वय २३) असे मयत तरुणीचे नाव आहे. पुण्यातील गणेशपेठमध्ये राहणाऱ्या रश्मी तेरवडीया या एका खासगी कंपनीत नोकरीस होत्या. त्यांच्या कुटुंबियांना अनेक अडचणी येत असल्याने संजय तेरवडीया यांनी ग्रहशांती करण्यासाठी नातेवाईकांसह अमळनेर येथे धार्मीक विधी करण्यासाठी तेरवडीया व दालवाले कुटुंबिय हे मंगळग्रह मंदिरात जाण्यासाठी जळगावात आले होते.
संजय तेरवडीया यांचा मुलगा राहुल हा देखील कुटुंबियांसोबत मंगळग्रह मंदिरात दर्शनासाठी येणार होता. मात्र त्याला सुट्टी मंजूर न झाल्यामुळे त्याचे येणे अचानक रद्द झाले होते. त्यामुळे आई वडीलांसह बहिण हे तिघेच आल्यामुळे राहुल हा घटनेतून बचावला. वडिलांसह बहिणीचा मृत्यू झाल्यामुळे राहुलसह त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पुण्यातील गणेश पेठमध्ये राहणारे संजय तेरवडीया हे पत्नी, मुलगी व मुलासह वास्तव्यास होते. दिवाळीनिमित्त पत्नीसह मुलीला घेवून ते जळगावात राहणारे त्यांचे साडू भरत दालवाले यांच्याकडे आले हाते. याठिकाणी आल्यानंतर ते अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी त्यांनी संदीप शेजवळ यांचे वाहन भाड्याने घेतले होते. वाहन चालकाने ईच्छादेवी पोलीस चौकशीशेजारील रिफीलींग सेंटवर वाहनात गॅस रिफिलींग करीत असतांना गॅस सिलींडरचा स्फोट होवून तेरवडीया यांच्या कुटुंबातील तिघे, दालवाले कुटुंबातील चौघांसह गॅस भरणारा, वाहन चालक व पोलीस कर्मचारी हे गंभीररित्या भाजले गेले होते. आतापर्यंत यातील ७ जणांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. तर इतर जखमींवर उपचार सुरु आहेत.