जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात महयुतीकडून भाजपचे विद्यमान आमदार राजूमामा भोळे यांची तर जळगाव ग्रामीण मधून शिवसेना शिंदेगटाचे विद्यमान आमदार गुलाबराव पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. या लढतीत महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप तरी ठरलेला नाही.
एकीकडे महायुतीचे संवाद मिळावे सुरू झाले असून दुसरीकडे मात्र त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून कुणाला रिंगणात उतरावयाचे यावर एकमत झालेले नाही. उमेदवारी मिळण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या काही नेत्यांकडून मुंबई वाऱ्या सुरु झाल्या आहे. दरम्यान ठाकरे गटातील इच्छुकांनी तिकिटासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांची ही भेट घेतल्याच्या चर्चेने गोंधळात भर पडली आहे.
काही महिन्यांपूर्वी शरद पवार जेव्हा जळगाव शहरात आले होते त्यावेळी मविआतील काही नेत्यांनी स्वतःचे वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीण मतदार संघात अद्याप उमेदवार निश्चित केलेला नाहीये. त्यामुळे तिकीट मिळण्यासाठी शरद पवार यांच्याकडून हिरवा कंदील मिळेल याकरिता ठाकरे गटातील काही नेते प्रयत्न करीत आहेत. मात्र या प्रयत्नात एका गटातील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर दिसू लागला आहे.