एमआयडीसी पोलीसांची कारवाई
जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली गावात काही दिवसांपूर्वी हाणामारीची घटना झाली होती, या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलिसांनी गुरूवारी वॉश आऊट मोहीम राबत गावातील अवैध, गावठी दारू विक्रेत्यांविरुद्ध कारवाई केली. दरम्यान शिरसोली शिवारात सात ठिकाणी सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या.
या कारवाईत गावठी हात भट्टी, कच्चे पक्के रसायन असे एकुण ११,४६० लीटर दारु असा एकूण ५,४३,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. त्याचबरोबर दारू विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिरसोली प्र.बो. येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास एका गटाने दूध विक्रेत्याच्या घरावर हल्ला करत दहशत निर्माण केली होती. त्यानंतर मारहाण करणाऱ्यां विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.
दरम्यान गुरुवारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोलिस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, सफौ अधिकार पाटील, पोना प्रदीप पाटील, योगेश बारी, नितीन ठाकुर, शुध्दोधन ढवळे, गणेश ठाकरे, तुषार गिरासे, नाना तायडे, किरण पाटील, मंदार पाटील, सिध्देश्वर डापकर, रतन गिते, चंद्रकांत पाटील यांच्या पथकाने शिरसोली शिवारात जात सात ठिकाणी धाड टाकून ही कारवाई केली आहे.