जळगाव, (प्रतिनिधी) : आपल्या आजीच्या घरात एका नातवाने चोरी केल्याचा प्रकार समोर आलायं. आजीच्या घरी झोपण्यासाठी गेलेला असताना नातवाने चोरलेले ६ लाख २ हजार १४० रुपयांचे सोने तो विकायला आला असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने त्याचा हा डाव फसला. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला बळीराम पेठेतून अटक केली असून त्याच्याकडून सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.
शिवाजीनगरात एकट्याच राहत असलेल्या गोदावरी पंडित पाटील (८८) या वृद्ध महिलेच्या घरी २३ ऑगस्ट रोजी त्यांची मुलगी आणि नातू हे आले होते. (केपी)घरात झोपलेले असताना योगेश पाटील याने कपाटातून महिलेचे दागिने आणि २० हजार रुपयांची रोकड चोरुन नेली होती. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपास करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिल्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संशयिताचा शोध घेत असताना संशयित योगेश पाटील हा चोरलेले दागिने विक्रीसाठी बळीराम पेठ परिसरात फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार योगेशची झडती घेतली असता, त्याच्याकडे चोरलेले दागिने सापडले.(केपी)त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने हे दागिने आजीच्या घरुन चोरी केल्याची कबुली दिली.
पथकाने दागिने जप्त करून संशयिताला शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढील तपास सपोनि रामचंद्र शिखरे करीत आहेत. ही कारवाई पोउनि गणेश वाघमारे, दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, संजय हिवरकर, हरिलाल पाटील, विजय पाटील, रवी नरवाडे, राजेश मेढे, प्रदीप सपकाळे यांनी केली.