जळगाव, (प्रतिनिधी) : शेअर मार्केटींगमध्ये पैसे गुंतवणुकीच्या नावावर जळगाव शहरातील एसएमआयटी महाविद्यालय परिसरातील रहिवाशी असलेल्या व खासगी नोकरी करणाऱ्या तरुणाची तब्बल ११ लाख ३० हजार रुपयांमध्ये फसवणूक झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय वसतकर (वय ४२) असे फिर्यादीचे नाव आहे. दि. २८ जुलै ते २ ऑक्टोबर दरम्यान ही फसवणूक झाली आहे. वसतकर यांना नारायण जिंदल व चिन्मई रेड्डी या नामक व्यक्तीनी शेअर मार्केटींग संदर्भातील एका व्हॉट्सॲप ग्रृपमध्ये ॲड केले. त्यानंतर विश्वास संपादन करून, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास फायदा करून देण्याबाबतचे आश्वासन दिले. यासह एक ऑनलाईन ॲप डाऊनलोड करण्याचे सांगत, त्यात पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले.
फिर्यादीला शेअर मार्केटमध्ये २ लाख ८२ हजार रुपयांचा नफा झाल्याचे सांगत, संबधितांनी फिर्यादीकडून ११ लाख ३० हजार रुपये ऑनलाईन नेटबॅकिंगव्दारे वेगवेगळ्या बँक खात्यात स्विकारले. मात्र, ही रक्कम भरल्यानंतर फिर्यादीने संबधितांशी संपर्क साधून, ती रक्कम परत मागितली. मात्र, त्यानंतर संबधितांशी संपर्क होऊ शकला नाही. शेवटी वसतकर यांना स्वत:ची फसवणूक झाल्याचे समजताच बुधवारी सायबर पोलिस ठाण्यात येऊन नारायण जिंदल व चिन्मई रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.