जळगाव, दि.२१ (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गोर बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ रामराव महाराज यांच्या भेटीदरम्यान चर्चा झाली होती, देशभरातील सर्व गोर बंजारा समाजाला एकाच सुचीमध्ये सामाविष्ट करुन अनुसूचित जमातीत सामाविष्ट करावे, नाॅनक्रिमीलीअरची अट रद्द करावी, गोर बोलीला संवैधानीक दर्जा द्यावा, गोर बंजारा समाजातील घुसखोरी थांबवावी यासह इतर मागण्यांचे निवेदन दिले होते परंतु पंतप्रधान मोदींनी यापैकी एकही मागणी पुर्ण न करता संत रामराव महाराज यांच्या मागणीला केराची टोपली दाखवल्याचा आरोप करत गोरसेना या सामाजिक संघटनेने राष्ट्रीय अध्यक्ष प्रा संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली आहेत.
गोर बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ रामराव महाराज यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्यक्षात भेटून समाजाच्या प्रमुख मागण्या मागीतल्या होत्या व या मागणीला दुजोरा देऊन त्या तात्काळ सोडविण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करु असे पंतप्रधान मोदींनी संत रामराव महाराज यांना आश्वाशीत केले होते. मात्र आतापर्यंत कुठलाही निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे.
बोगसगिरी हटाव बंजारा बचाव मागणीसाठी गोरसेना अधिकच आक्रमक झाली असून सर्व विमुक्त जाती मधील सर्व समाजघटकांनी उघड पाठिंबा दिलेला आहे. घुसखोरी विरोधात वातावरण तापलेले असतांनाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहरादेवी येथे नंगारा लोकार्पण सोहळ्यासाठी येत आहे या अगोदर नंगारा भवनाच्या भूमीपूजनाच्या व पायाभरणीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महाराष्ट्रातील तमाम मंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात ज्या मागण्या बंजारा समाजाकडून मांडण्यात आल्या होत्या त्यापैकी एकही मागणी पुर्ण झालेली नसताना पुन्हा त्याच नंगारा भवनाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजकांनी त्याच त्या मागण्यांसाठी तीन तीन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. समाजाला राजकारणापुरते वापरले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आता नंगारा पुर्ण झाले असून लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहे. दरम्यान ही शेवटची संधी आहे जर वरील मागणीला हरताळ फासले तर महाराष्ट्र सरकारला येत्या निवडणुकीत घरचा रस्ता गोरसेना दाखविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले आहे. यावेळी गोरसेना जिल्हाध्यक्ष अर्जून जाधव, सचिव चेतन जाधव, कैलास जाधव आदी उपस्थित होते.