जळगाव (प्रतिनिधी ) : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा मराठा समाजातील मातब्बर व्यक्तीमत्व मानले जाणारे दिलीप खोडपे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश घेणार असून जामनेर विधानसभा मतदार संघातून उभे राहून ते ६ वेळा आमदार झालेले भाजपचे दिग्गज नेते गिरीश महाजन यांना आव्हान देणार असल्याचे बोलले जात आहे. जामनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मराठा समाज असून बंजारा समाज देखील त्यांच्या पाठीमागे उभा राहण्याची चिन्हे आहेत.
दिलीप खोडपे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, ३५ वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करत आलो. जेव्हा पक्षाची परिस्थिती अतिशय खराब होती व टोकाचा संघर्ष करायचा होता, तेव्हा तो संघर्ष भी पक्षाच्या सर्व माझ्या सहकाऱ्यांसोबत केला. मी कधीही पक्षाकडे पद अथवा लाभाची कामे मागितली नाहीत. मी आणि माझ्या सर्व जिवाभावाच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संघर्षामुळे मला ते आपसूकच मिळत गेले, तर बऱ्याच वेळेस माझे कार्यकर्ते व सहकाऱ्यांसाठी मी अनेक पदांचा त्यागही केला.
परंतु मागील दहा वर्षापासून पक्षामध्ये स्वकर्तृत्वाने मोठे होण्यापेक्षा दुसऱ्याला नालायक ठरवून मोठे होण्याची स्पर्धा सुरू झाली. पक्षाच्या मूळ ध्येयधोरणापासून दूर जाऊन कार्यकर्त्यांना डावलण्यात, स्वतःचे खिसे भरण्यात, प्रत्येक गावात पक्षाचे दोन गट उभे करण्यात व दडपशाही करण्यातच पक्षातील लोक व्यस्त असल्याचे मागील दहा वर्षांपासून दिसून आले. गावागावात दोन गट उभे करून आपापसातच वाद लागल्यामुळे पक्षाचेही खूप नुकसान झाले. पक्षाचे नियम व ध्येयधोरणे हे अस्तित्वातच नाहीत असे चित्र आपल्या तालुक्यामध्ये झालेले आहे.
जामनेर तालुक्यातील जनता, माझे सर्व जिवाभावाचे सहकारी व कार्यकर्ते यांच्यासाठी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सेवेत हजर असेल. माझा कोणत्याही नेत्यावर अथवा पदाधिकाऱ्यांवर राग किवा आकस नाही. परंतू, सततची हेटाळणी, अपमानास्पद वागणुक, डावलने, मूळ विचार व ध्येयधोरणांपासून जामनेर तालुक्यात स्वतःच्या डोळ्यासमोर दूर जात असलेला पक्ष याला कंटाळून, माझा स्वाभिमान जपण्यासाठी मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच सर्व पदांचा राजीनामा देत आहे. असे दिलीप खोडपे यांनी म्हटले आहे.