मुंबई (वृत्तसंस्था ) : आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. दरम्यान सगळीकडेच उत्साहाचे आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गणरायासोबत रिमझिम पावसाने देखील हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे.
आज पुण्यासह मुंबईत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा येथे काही ठिकाणी वादळ, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
नाशिक आणि कोल्हापूमध्ये देखील चांगला पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेडसह काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्यामुळे मान्सूनचे वारे पुन्हा सक्रिय झाले आहे.