जळगाव, दि.३१ (प्रतिनिधी) : येथील परिवर्तन या संस्थेने शहरात नाट्य चळवळ रुजावी, वाढावी यासाठी परिवर्तन प्रेक्षक सभासद योजना राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वर्षभरात १२ नाटक या योजनेत दाखवण्यात येणार आहेत. व्यावसायिक रंगभूमीवरील प्रयोगांसोबतच परिवर्तन निर्मित प्रयोग देखील या योजनेत सादर करण्यात येणार आहेत. या योजनेतील सीजन टू चे पहिले नाटक देवेंद्र पेम लिखित व दिग्दर्शित “ऑल द बेस्ट” हे होईल. १९९३ साली हे नाटक रंगभूमीवर आले व या नाटकाने इतिहास घडवला. आतापर्यंत या नाटकाचे ४००० प्रयोग झालेले आहेत.
या नाटकाने रंगभूमीला उर्जित अवस्था तर आणलीच पण भरत जाधव, संजय नार्वेकर, अंकुश चौधरी हे तीन स्टार देखील इंडस्ट्रीला दिले आता नव्या पिढी सोबत या नाटकाचे पुनर्जीवन झाले आहे आणि त्याचा प्रयोग जळगावला दि.३१ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात होतो आहे. या योजनेची आणि एकूणच उद्याच्या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती परिवर्तनचे हर्षल पाटील यांनी दिली.
परिवर्तन प्रेक्षक सभासद योजनेला उत्तम प्रतिसाद लाभलेला आहे. जैन उद्योग समूहाचे चेअरमन अशोक जैन हे देखील परिवर्तन सोबत आहेत. ऑल दि बेस्ट च्या पोस्टर अनावरण प्रसंगी प्रेक्षक सभासद योजना प्रमुख अमर कुकरेजा, नंदलाल गादीया, किरण बच्छाव, छबीराज राणे, शिरिष बर्वे, शंभू पाटील, माधवी बर्वे , डॉ. रेखा महाजन, विनोद पाटील, मानसी गगडानी, गणेश सोनार, पवन भोई, समाधान पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.