महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था ) ;- बदलापूर येथील ४ वर्षीय मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी बदलापूरकरांनी ९ ते १० तास रेल रोको आंदोलन करून सार्या देशाचे लक्ष वेधून घेतले . याघटनेचे पडसाद उमटत आहे. आता विरोधी पक्षांनी देखील या घटनेच्या निषेधार्थ येत्या २४ रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. आघाडीचे सगळे पक्ष या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. बदलापूर प्रकरणी महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्ष या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. बदलापूर प्रकरणी महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. नाना पटोले आजच बदलापूर येथे जाऊन घटनास्थळी भेट देणार आहे.
दरम्यान बदलापूर इथं दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. पुणे, जळगाव, सांगलीत या घटनेच्या निषेधार्थ आंदोलनं करण्यात आली. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं आंदोलन झालं.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने हे आंदोलन केलं.पुण्यातील गुडलक चौकामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात आणि बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पवार गटाचं आंदोलन झालं. सांगलीतही राष्ट्रवादी शरद पवार गटाने आंदोलन केलं आहे. ठाकरे गटाकडूनही आंदोलन करण्यात आलं.