जळगाव (प्रतिनिधी ) शहरातील चौघुले प्लॉट परिसरातील पार्वताबाई ओक नगरात व्यावसायिक भालचंद्र माधव चौधरी यांच्या घरावर सोमवारी सायंकाळी पाच वाजता वीज कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाच दुखापत झाली नाही, मात्र घराच्या तिसऱ्या मजल्याचा बाहेरील स्लॅब कोसळला, त्यामुळे किरकोळ नुकसान झाले आहे.
चौधरी यांच्या गल्लीतील विजेच्या खांबावर वीज कोसळली. तेथून चौधरी यांच्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरील भिंतीवर वीज आदळली. ज्या भिंतीवर वीज आदळली, त्या खोलीत चौधरी यांचा भाचा दीपक पाटील (वय ३०, रा. जावदा, ता. शहादा, जि.धुळे) हा झोपला होता. अचानक आवाज व उजेड झाल्याने दीपक घाबरला, तो रक्षाबंधनासाठी आला होता. वीज पडून स्लॅबचे नुकसान झाले. खालच्या खोलीत चौधरी यांच्यासह कुटुंबातील ११ जण झोपलेले होते. या घटनेत घरातील विजेचे उपकरण बंद पडले. तसेच ज्या खांबावर वीज पडली, तो वाकला.