जळगाव (प्रतिनिधी ) : आठ वर्षीय मुलाला कोणीतरी पळवून नेल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असतांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या (एएचटीयू) पथकाने त्या मुलाचा चार वर्षांनी शोध लावला असून तो आपल्या आईसोबतच मिळून आला. तसेच तो छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सद्या वास्तव्यास असून तो शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे.
शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरातील आदित्य अभिनंदन काशीकापडणे (वय ८) हा अल्पवयीन मुलगा अंगणात खेळत असतांना दि. १७ नोव्हेंबर २०२० रोजी त्याला कोणीतरी पळवून नेले होते. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दि. १८ नोव्हेंबर २०२० रोजी हरविल्याची नोंद करण्यात आली होती. या अल्पवयीन मुलाचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे (एएचटीयू) देण्यात येऊन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तपासाविषयी सूचना दिल्या होत्या,
त्यानुसार एएचटीयुचे सपोनि शीतलकुमार नाईक, सहाय्यक फौजदार विठ्ठल फुसे, रवींद्र गायकवाड, पोहेकॉ मनीषा पाटील, दीपक पाटील, अनिल पाटील, पोलिस नाईक अर्चना भावसार, सलीम शेख हे शोध घेत होते.
अंगणात खेळत असलेला मुलगा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झाला होता, तर त्याची आई त्याच दिवशी जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झाल्याची पोलिसात नोंद करण्यात आली होती. तपास करणाऱ्या पथकाला याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्या दृष्टीने तपास सुरु केला. दरम्यान, या घटनेचा कुठलाही सुगावा किंवा पुरावा नसतांना पथकाने त्या मायलेकांचा शोध घेतला.
पोलिसांना तपासात त्या बेपत्ता मुलाची मावशी जळगावात राहत असल्याचे समजले. त्यांनी तीला विश्वासात घेत अधिकची माहिती जाणून घेतली. त्यावेळी तिने सदर महिला व मुलगा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असल्याचे सांगितले. तसेच त्या महिलेचा मोबाईल क्रमांक मिळवून तिचे लोकेशन शोधले. त्या वेळी पथक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे पोहचले व तेथून माय-लेकांना जळगावात आणले. मुलाला शहर पोलिसांच्या तर आईला जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
कौटुंबिक वादातून ती महिला मुलाला सोबत घेवून घरातून निघून गेली होती. सद्या ती वैजापूर येथे वास्तव्यास होती. तसेच रोजंदारीने काम करून मुलाचे पालनपोषण करीत होती. तसेच या मुलाला शिक्षणदेखील देत असल्याने हा मुलगा इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होता,