जळगाव (प्रतिनिधी) : येथील जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग.स.सोसायटीची सर्वसाधारण सभा रविवारी नूतन मराठा महाविद्यालयाच्या हॉलमध्ये घेण्यात आली. अध्यक्षांनी सर्व ठरावांना मंजुरी देत १५ मिनिटात सभा गुंडाळली. सभेत विषय वाचन सुरु असताना काही सभासदांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यांचे म्हणणे मंचावरील सत्ताधार्यांनी ऐकून घेतले नाही. तसाच विषय वाचन आणि ठराव मंजूर असा रेटा सुरु असल्याने एका सभासदाने विषय क्रमांक ७ वर हरकत घेऊन त्याचे स्पष्टीकरण मागितले. त्यांना कोणताही प्रतिसाद न दिल्याने सभासदांनी अध्यक्षांसह संचालक मंडळाला जाब विचारला.मात्र, सभेत गोंधळ होऊन काही सभासद आणि अध्यक्ष यांच्यात शिवीगाळ करीत शाब्दीक बाचाबाची होऊन खडाजंगी उडाली.
यावेळी व्यासपीठावर ग.स. सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील, उपाध्यक्ष रविंद्र सोनवणे, गटनेते अजबसिंग पाटील, भाईदास पाटील, योगेश सनेर, विपीन पाटील, महेश पाटील, अजय देशमुख, अनिल गायकवाड, अजयराव सोमवंशी, मनोज माळी, सुनिल सुर्यवंशी, रागिणी चव्हाण, प्रतिभा सुर्वे, विजय पवार, मंगेश भोईटे, अमरसिंग पवार, विश्वास पाटील, निलेश पाटील, प्रविणकुमार कोळी, ज्ञानेश्वर सोनवणे, योगेश इंगळे, रावसाहेब पाटील, माजी अध्यक्ष मनोज पाटील यांच्यासह संस्थेचे आजी-माजी अध्यक्ष-उपाध्यक्ष उपस्थित होते.
सन २०२३-२०२४ चा वैधानिक लेखापरीक्षण अहवाल वाचन झाल्यानंतर या विषय क्रमांक सातवर सभासद गणेश देशमुख यांनी हरकत घेतली. याविषयावर लेखी पत्र देवूनही अहवाल उपलब्ध करुन दिलेला नाही. याविषयावरुन सर्वसाधारण सभेत काही सभासदांनी पुढे येऊन एका सभासदाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याची जबाबदारी अध्यक्षांची आहे. संस्था अध्यक्ष उदय पाटील हे काय स्वत:ला ग.स.सोसायटीचे मालक समजत आहेत का? असा सवाल सभासद स्वराज्य पॅनल प्रमुख आर.के. पाटील यांनी उपस्थित केला. त्यानंतर सोमनाथ पाटील, चाळीसगावचे विनोद पाटील, विक्रम सोनवणे आदींनी अध्यक्षांना जाब विचारल्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यानंतर विनोद पाटील हे व्यासपीठावर चढून त्यांनी अध्यक्ष उदय पाटील यांच्याशी शाब्दीक शिवीगाळ आणि खडाजंगी केल्याने धावपळ उडाली.
दरम्यान राष्ट्रगीत सुरु करण्यात आल्याने वादावर पडदा पडला. त्यानंतर ग.स.सोसायटीची सभा गोंधळातच आटोपल्याने सभा पुन्हा घेण्याची मागणी सभासद गणेश देशमुख यांच्यासह सभासदांनी केली. तक्रारदार सभासदांना लेखी उत्तर दिले आहे. तसेच समाधान होत नसेल तर संस्थेत येऊन अहवाल दाखविण्यात येईल,असे सांगून सभासदाचे समाधान होत नसेल तर काय करणार अशी प्रतिक्रिया ग.स.अध्यक्ष उदय पाटील यांनी दिली. त्यानंतर ग.स.सोसायटीची सभा गोंधळातच आटोपल्याने सभा पुन्हा घेण्याची मागणी सभासद गणेश देशमुख, विक्रम सोनवणे, आर.के.पाटील यांच्यासह सभासदांनी केली.तसेच सभासदांना अध्यक्षांकडून धमकावल्या जात असल्याचा आरोप गणेश देशमुख यांनी केला.