स्वातंत्र्यदिनी ४८ लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा
मुंबई (वृत्तसंस्था ) : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर पैसे पडण्यास सुरुवात झाली आहे. १४ ऑगस्ट रोजी लाखो महिलांना त्यांच्या खात्यात पैसे टाकण्यात आले असून आज पहाटे चार वाजता आणखी ४८ लाख महिलांच्या बँक खात्यात रक्कम हस्तांतरीत करण्यात आली आहे. याबाबत महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.
माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासंदर्भात तटकरे यांनी एक्स या सोशलमिडीयावर ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ हस्तांतरण करण्यास कालपासून सुरुवात झाली आहे. “स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस ३२ लाख भगिनींना तर आज स्वातंत्र्यदिनी पहाटे ४ वाजता ४८ लाख महिलांना त्यांच्या बँक खात्यात लाभ हस्तांतरित करण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ८० लाख महिलांना लाभ हस्तांतरण झाला आहे. सर्व पात्र महिलांना रक्षाबंधनापूर्वी लाभ हस्तांतर करण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर कार्यरत आहोत,” असे आदिती तटकरे यांनी सांगितले.
याआधी १४ ऑगस्ट रोजी राज्य सरकारने पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सुरुवात केली आहे. १४ ऑगस्ट रोजी एकूण ३२ लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरीत करण्यात आले आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून अर्जांची छाननी करण्याची प्रक्रिया चालू होती. येजनेच्या नियमांत वेळोवेळी अनेक बदल झाल्यामुळे या अर्जांची तपासणी करण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर होते. मात्र सरकारन रक्षाबंधनाच्या अगोदर १७ ऑगस्टपर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे टाकण्याचे जाहीर केले होते. या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट आहे. ज्या महिलांच्या बँक खात्यात अद्याप पैसे आलेले नाहीत. त्यांना १७ ऑगस्टपर्यंत हा निधी मिळण्याची शक्यता आहे.