जळगाव, दि. 21 – विद्यार्थ्यांच्या तसेच शिक्षकांच्या कला कौशल्याना वाव मिळावा या दृष्टिकोनातून प्रत्येक वर्षी शाळेतर्फे शिक्षक तसेच विद्यार्थ्यांमार्फत हस्तलिखित प्रकाशीत केले जाते. जेणे करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी हा हेतू साध्य होतो. हाच दृष्टिकोन घेऊन प्रगती विद्यामंदिर शाळेने जरी शाळेत विद्यार्थी नाही तरी आपला वार्षिक उपक्रम मागे राहू नये, या पार्श्वभूमीवर शिक्षकांमार्फत ‘लिखित कोविड-19’ या हस्तलिखिताचे विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते करण्यात आले.
या हस्तलिखितात कोरोना या रोगाची लक्षणें, उपाय तसेच घेण्यात येणारी खबरदारी, मनात असलेले विविध प्रश्न यांची उत्तरे हे स्पष्टीकरणात्मक देण्यात आलेली आहे. या हस्तलिखितात कोरोना या विषयी जनजागृतीचे काम करण्यात आले आहे. प्रकाशन सोहळ्याप्रसंगी विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल यांनी आपले मनोगत सांगताना ही भयावह परिस्थिती आहे यात आपल्याला एकजुटीने राहून या परिस्थितीचा सामना करायचा आहे व ही शैक्षणिक वाटचाल अशीच अवीरत चालवायची आहे हे सांगितले. अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांनी उपक्रमाचे कौतुक करत शिक्षकांने उपक्रमशील राहणे ही या काळाची गरज आहे. असे मत व्यक्त केले. सचिव सचिन दुनाखे यांनी हस्तलिखिताला मार्गदर्शन करणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा फेगडे यांचे कौतुक करत सर्व टीमचे अभिनंदन केले. याप्रसंगी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.